जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात सीए परीक्षेत उत्तीर्ण
पनवेलमधील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात सीए परीक्षेत उत्तीर्ण
पनवेलमधील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : राज भंडारी
लहानपणापासूनच एखादी जिद्द आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत कशी पोहोचवू शकते, याचे द्योतक उदाहरणं म्हणजे नवीन पनवेल येथील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात. कुणाल याने आपल्या जिद्दीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केलं आहे. त्याच्या या यशानंतर परिसरातील नागरिकांनी कुणाल याला भेटून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कुणालचे पिता सिद्धार्थ खरात हे वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहत होते. ते पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार शेडमध्ये शासकीय सेवेत होते. सन 1994 साली ते पनवेलमध्ये राहण्यास आले. त्यांना एकूण 3 मुलगे आहेत. मोठा शशांक आणि त्याच्या पाठीमागे कुणाल आणि मृणाल ही जुळी भावंडे असा त्यांचा परिवार. कुणाल आणि मृणालचा जन्म सन 1998 साली पनवेलमध्येच झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार असणारा कुणाल हा नक्कीच उच्च स्थानी जाईल असा विश्वास घरातील सर्वांनाच होता. सुरुवातीचे शिक्षण हे नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर येथून सुरु केले आणि दहावीपर्यंत कुणाल एकाच शाळेत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्याने पोतदार महाविद्यालयात प्रवेश घेतला.
कुणाल याला लहानपणापासूनच सीए बनण्याची इच्छा होती. तशी इच्छा त्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना सांगितली होती. घरातील संस्कार आणि कुणालची जिद्द त्याला सीए च्या पदापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरली. कुणालने आपली जिद्द खरी करण्यासाठी त्याने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच सीएच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली होती. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये तो साईटीची परीक्षा देऊन उत्तीर्ण देखील झाला. यानंतर त्याने पोतदार महाविद्यालयातील आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि 3 वर्षांसाठी नवीन पनवेल येथील जैन अँड सन्स या फर्ममध्ये त्याने प्रशिक्षण (एंटरशिप) घेतले.
नुकत्याच पार पडलेल्या सीएच्या परीक्षेत त्यांनी प्रयत्न केले. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत सीएच्या परीक्षेतील आपल्या सहाव्या प्रयत्नाचे सातत्य राखत त्याने यश संपादित करून तो उत्तीर्ण झाला. कुणालच्या या यशामध्ये त्याचे आई – वडील, भाऊ, मित्र परिवार, तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जैन अँड सन्स मधील सहकाऱ्यांचा मोठा हातभार लागला असल्याचे त्याने बोलताना सांगितले. कुणालच्या या नेत्रदिपक यशानंतर त्याच्यावर नातेवाईक, मित्र परिवारासह पनवेलमधील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.