राधा पाटील मुंबईकरच्या दिलखेचक अदा; करंजाडेकर फिदा
3 आठवडे चाललेल्या करंजाडे महोत्सवाची लावणी नृत्याच्या कार्यक्रमांनी सांगता

3 आठवडे चाललेल्या करंजाडे महोत्सवाची लावणी नृत्याच्या कार्यक्रमांनी सांगता
पनवेल : राज भंडारी
गेली 7 वर्षे करंजाडेमधील नागरिकांसाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्यावतीने करंजाडे महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षीही जवळपास तीन आठवडे हा महोत्सव विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला. करंजाडे वासियांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देत आपली हजेरी नोंदविली. करंजाडे महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच मिस करंजाडे ही स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये करंजाडे येथील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी सिने तारका लावणी नर्तिका राधा पाटील मुंबईकर हिच्या दिलखेचक अदांनी करंजाडे महोत्सवाची सांगता पार पडली.
आपल्या दिलखेचक अदा आणि नृत्यांनी तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील अख्या महाराष्ट्राला माहित आहे. पण आता गौतमी पाटीलला टक्कर देण्यासाठी राधा पाटील मुंबईकर ही मैदानात उतरली आहे. अवघ्या 4 महिन्यापूर्वी प्रकाश झोतात आलेल्या राधा पाटील मुंबईकर हिने आपल्या नृत्याने तरुणांना वेड लावलं आहे. करंजाडे महोत्सवाच्या सांगता समारंभातील तिच्या मनमोहक आणि दिलखेचक अदांनी करंजाडे सह पनवेलमधील तरुणांना देखील वेडं केलंय. करंजाडेचे माजी सरपंच तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या महोत्सवात तरुणाईने अख्ख मैदान तुडुंब भरून गेलं होतं. कातिलोंकी कातिल आणि राधा पाटील असा सुर यावेळी तरुणांच्या तोंडी घुमताना दिसला.
तब्बल 3 आठवडे चाललेल्या या महोत्सवामध्ये करंजाडे वासियांसाठी दर्जेदार मेजवानीसह विविध वस्तूंच्या खरेदीचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच बच्चे कंपनीसाठी याठिकाणी बालनगरी उभारून यामध्ये मुलांच्या हौशी मौजीचे खेळ ठेवण्यात आल्यामुळे करंजाडेसह पनवेलमधील नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला. एकूण 23 दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उवस्थिती दाखविली होती.